मकालू हे जगातील सर्वात उंच असलेले पाचवे शिखर. वैनतेय संस्थेच्या राहुल सोनवणे याच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे नाशिककर मकालू पर्वताच्या बेस कॅम्प ला जाण्याचे ठरले. तयारीचे सगळे सोपस्कार पूर्ण करून आम्ही काठमांडू विमानतळावर पोहोचलो. आपल्याला घ्यायला टूर ऑपरेटर केशव थापा येणार आहेत हे सगळ्यांच्या तोंडून ऐकले होते. विमानतळावर बस स्टँड सारखी गर्दी व्हायला लागल्यापासून फलाटावरून उशीरा निघण्याचा बसचा गुणधर्म विमानांनीही शिकून घेतला होता. अर्थात केशव थापा मात्र अगदी प्रसन्न चित्ताने आमचे स्वागत करते झाले. नेपाळमध्ये विशेष महत्व असणाऱ्या पारंपरिक झेंडूच्या फुलांच्या माळा घालून आम्हाला गाडीने पशुपतीनाथ मंदिरात पाठविले.
विमानतळाच्या अगदी लगतच असणाऱ्या एका रस्त्याने आम्ही पशुपतीनाथ मंदिराच्या मागील बाजूस पाचदहा मिनिटात पोहोचलो. मंदिराच्या मागील बाजूस प्राचीन पण अरुंद पात्राची बागमती नदी वाहत होती तर पलीकडे अनेक चिता जळताना दिसत होत्या. हे अनपेक्षित दृश्य पचवून आम्ही पटकन मंदिराच्या मुख्य प्रांगणात दाखल झालो. वेळ संपल्याने दर्शन मिळणे शक्य नव्हते परंतु मंदिराचा परिसर थोडाफार न्याहाळता आला. पॅगोडा च्या आकारातील उतरत्या छपरांची मंदिराची रचना खूपच वेगळी भासते. आसपासच्या इमारतीच्या खिडक्या दरवाजे म्हणजे संपूर्ण लाकडाच्या फळ्यांपासून बनविलेले, पेठ किंवा इतर ग्रामीण भागातील जुन्या वाड्यांची आठवण करून देत होते. दगडी फरश्यांचा रस्ता आणि जुन्या इमारतींमुळे हा परिसर आपल्याला जुन्या काळातच घेऊन जातो.
जागेच्या अभावामुळे काठमांडू शहर हे अगदी दाटीवाटीने वसलेले वाटते. मुंबईच्या लोकलमध्ये जशी खेटून गर्दी असते त्याप्रमाणे येथल्या इमारती एकमेकांना चिकटून उभ्या होत्या. थमेल हा काठमांडूमधील पर्यटकांचा राबता, अनेक हॉटेल्स, ट्रेकिंगचे साहित्य आणि मोठा बाजार अंगावर वसविणारा एक मोठा भाग आहे. जेमतेम चारपाच जण बसू शकतील अश्या हॉटेलच्या लॉबीत पोहोचलो. जागा छोटीशीच असली तरी मालक मात्र अगदी रसिक असावा याची साक्ष आजूबाजूला ठेवलेल्या अनेक वस्तू देत होत्या. नक्षीकाम असलेल्या लाकडाच्या पेट्या, तांब्याची जुनी भांडी, कधीकाळी मौल्यवान दागिन्यांची राखण करणारी लाकडी पेटी, बुद्धाच्या विविध मुद्रांमधील आणि आकारातील विलोभनीय मूर्ती, बुद्धिजम मधील हातानी फिरविता येण्याजोगी प्रार्थना चक्रे, खुखरी, शिंगे इत्यादी अनेक वस्तूंनी हॉटेल सजविलेले होते.
 |
| सजविलेली हॉटेल लॉबी |
दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही सगळे आवरून सज्ज झालो. काळ्या रंगाची थोडी उंच टोपी, चेनचे जॅकेट, डाव्या पायाची घडी उजव्या पायावर ठेवलेली आणि खांद्यावरील लेदर बॅगवर डावा हात ठेवत गौर वर्णाचे केशव थापा एखाद्या नेपाळी राजा सारखे मोठे रुबाबदार दिसत होते. त्यांचा निरोप घेऊन आम्ही काठमांडू ते टूमलिंगटर हे नेपाळच्या पूर्वेकडील भागात जाणारे विमान पकडले. विमान उडताक्षणी सगळ्यांचे बारीक लक्ष होते ते आकाशात उत्तरेकडे दिसणाऱ्या विविध हिमशिखरांकडे. लांगटांग रेंज, नावाप्रमाणे एकमेकांजवळ असणारे गौरी शंकर शिखर, जगभरातील साहसवेड्यांचा विठ्ठल असलेला माउंट एवरेस्ट, शेजारी ल्होत्से आणि या सगळ्या रांगेपासून थोडेसे दूर स्वतः चा स्वतंत्र दरबार दिमाखाने भरविलेला मकालू सुद्धा दर्शन देत होता.
 |
| नेपाळमधील हिमालय |
डोंगरधारा लहान होत होत मैदानी प्रदेशाची नुकतीच सुरुवात होणाऱ्या प्रदेशात हे टुमदार विमानतळ लक्षणीय दिसत होते. धावपट्टी वरून पलीकडे एका मागोमाग एक अश्या अनेक डोंगर रांगा आणि त्याही मागून डोकाविणारी हिमशिखरे चित्र काढल्यासारखी दिसत होती.
 |
| टुमलिंगटर विमानतळ |
दोन जीप मध्ये आम्हा १४-१५ जणांचा ताफा कसाबसा कोंबला गेला. अर्ध्या तासात खांडबारी हे संखूवासभा या जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण आले. आता खांडबारी ते ट्रेकचा स्टार्टींग पॉईंट नुम गाव आमच्यापासून केवळ ४० किलोमीटर होते. पण नुकताच खणून काढलेल्या रस्त्यालाही लाजवेल असा हा रस्ता पार करायला एक तर मिनी बस किंवा ४*४ ड्राइव्ह असलेली जीप या शिवाय पर्याय नाही. आमचा चालक मोठ्या शिताफीने इकडे मोठ्या शिळा आणि तिकडे खड्डे यातून मध्येच फोर व्हील ड्राईव्ह चा वापर करून चेहऱ्यावर गीतेचे तत्वज्ञान कोळून प्यालेल्या स्थितप्रज्ञाच्या आवेशात चेहऱ्यावर काहीच न दाखविता गाडी वेगात दामटत होता. सगळे सांधे आणि अवयव यांच्या चार तासांच्या घुसळणी नंतर अखेर आम्ही नुम या मुक्कामाच्या गावी पोहोचलो तेव्हा पाच वाजले होते. संध्याकाळच्या सूर्यकिरणात न्हाऊन निघालेले नुम गाव विलोभनीय दिसत होते.
 |
| नुम गाव |
ट्रेकचा पहिला दिवस
नुम ते सेदुवा ५००० फूट
कालावधी ६ ते ७ तास
नुम गावातून समोरच्या डोंगरावर जवळपास सारख्याच उंचीवर सेदुवा गाव दिसत होते. अर्थात मध्ये बऱ्यापैकी खोल दरी आणि दोन डोंगरांना वेगळेकरणारी अरुण नदी ओलांडणे गरजेचे होते.
मोठ्या सॅक पोर्टर कडे देऊन लागेल तेवढेच महत्वाचे सामान छोट्या सॅक मध्ये पाठीवर टाकून आम्ही नुम गाव पाठीमागे सोडत उतरणीच्या वाटेनेनिघालो. घनदाट आणि उंच सूचीपर्णी वृक्षांच्या मधून वळणा वळणाने जाणाऱ्या वाटेच्या बाजूला
वेलदोड्याची भरपूर झाडे होती. जवळपास दीड तास उतरल्यानंतरही अरुण नदी अजून दूरच वाटत होती. आणखी थोडे उतरल्यावर अरुण नदीचा खळाळता आवाज ऐकू यायला सुरुवात झाली. थोड्याच वेळात नदी वरील सस्पेन्शन ब्रिज अर्थात झुलता पूल लागला. रुंदीला लहान असला तरीभक्कम लोखंडी दोरांच्या बांधणीचा पूल गावकऱ्यांसाठी हमरस्ता असण्याची आणि बाराही महिने सुरु असण्याची साक्ष देत होता. नदीच्या आसपासआणि पुलावर सगळ्यांनी फोटोग्राफी चा आनंद मनमुराद लुटला. आता वर जाणाऱ्या पायऱ्या आमची वाट बघत होत्या. कधी वळणदार तर कधीअगदी सरळसोट एका मागे एक अश्या पायऱ्यांनी तीन साडेतीन तास आमची दमछाक केल्यावर मुक्कामाचे ठिकाण सेदुवा आले.
मकालू बरुण पार्कचे एक छोटेसे ऑफिसही लागले. पार्कचे तिकीट काढून आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो.
 |
| अरुण नदी |
 |
| सस्पेन्शन ब्रिज अर्थात झुलता पूल |
 |
| सेदुवा गाव |
 |
| मुक्कामाची सोय |
सेदुवा ते ताशिगाव: ७००० फूट
कालावधी ४ ते ५ तास
सेदुवा गाव म्हणजे पायऱ्यांच्या आजूबाजूला वसलेलेच वाटत होते. या उंच जाणाऱ्या पायऱ्या हीच ताशिगाव ची वाट होती. साधारण १ तास पायऱ्यांचा मार्ग झाल्यावर उंचावर हळूहळू घेऊन जाणाऱ्या हिमालयातील पायवाटा आम्हाला प्रथम लागल्या. अशाच वळणदार रस्त्यावर आम्हाला चेक्सा नावाचे गाव लागले. शाळेसाठी ये जा करणारी असंख्य मुलेही वाटेत दिसली. साधारणपणे १ तास एका बाजूने चालणे यांच्यासाठी नित्याचे होते. गुळ पोळी आणि खास अहमदाबादी खाखरा यांनी क्षुधाशांती करून आम्ही पुढील वाटेला लागलो. लवकरच ताशिगावची प्राथमिक शाळा लागली, त्यात नेपाळी भाषेत मुले पाढे पाठ करत होती. ताशिगाव चे टी हाऊस अतिशय देखणे होते. एका बाजूला रेखीव हिरवेगार lawn आणि सभोवती लांबवर दिसणारी गच्च झाडी आणि डोंगररांगा मनाला आपसूक शांत करीत होत्या.
शेजारच्या रिकाम्या मैदानी जागेत आमची शेर्पा आणि पोर्टर मंडळी सामान बाजूला ठेवून लगेच volley बॉल खेळत होती. इथल्या डोंगराळ प्रदेशात थोडीशी सपाट जागा मिळाली की लगेच नेपाळचा राष्ट्रीय खेळ - volley बॉल सुरु होतो. दुसरा लोकप्रिय खेळ म्हणजे घराबाहेर उन्हातच उभ्याने खेळला जाणारा कॅरम चा डाव. इथला कॅरम आपल्यापेक्षा मोठा, साधारण ५४" चा आणि खेळताना रेषेच्या वरून मोठा स्ट्रायकर ठेवून खेळणारी मंडळी चहूकडे दिसत होती.
 |
| volley बॉल - ताशिगाव टी-हाऊस |
 |
| कॅरम खेळण्यात मग्न झालेली मंडळी |
ताशिगाव ते खोंगमा दांडा १२००० फूट
कालावधी ६ ते ७ तास
मकालू बेस कॅम्पचा एक ब्लॉग वाचल्याचे आठवतंय. त्यात हा रूट म्हणजे मोस्ट paved असल्याचे आणि "the steps would undoubtedly take toll on your feet" असे का लिहिले होते याचे उत्तर आज मिळायचे होते. ताशिगाव सोडल्यापासून डोंगराच्या आतील भागाला लागलो आणि वर बघू तश्या दगडी पायऱ्या दिसत होत्या. The Great Himalayan trail प्रकल्पाअंतर्गत या पायऱ्या नेपाळ सरकारने बांधून बारमाही रूट तयार केला. Alice in wonderland सारखे जसे वर जाऊ तसे आणखी वर जाणाऱ्या नवनवीन पायऱ्या सातव्या आसमान मध्ये घेऊन जातात की काय असा आभास होत होता. अखेरीस ६ तासांची हि चढाई आम्हाला १२००० फूट उंचीवरील खोंगमा दांडा या ठिकाणी ( डोंगरधारेवर) घेऊन गेली. आज ५००० फुटांची उंची गाठल्याने वातावरणातील बदलही लक्षणीय होते. सूर्य महाराज ३ वाजताच गायब होऊन थंडीचा जोर वाढायला सुरुवात झाली होती.
 |
| खोंगमा दांडा |
 |
| खोंगमा दांडा येथील रमणीय संध्याकाळ |
पहाटेच्या सुमारास आकाशातील तारकांचा खेळ कधी नव्हे असा स्पष्ट दिसत होता, एरवी मागच्या बाकावर बसणे पसंत असलेल्या लहान मोठ्या ताऱ्यांनीही आवर्जून हजेरी लावली असावी. आकाश गंगांचे अस्पष्ट पट्टे आणि विविध तारकापुंजांचे विविध आकार ठळक होत होते. क्षितिजावर ३-४ उल्का देखील पडताना दिसल्या.
खोंगमा दांडा Watch Tower १२८०० फूट
१०००० फुटांवर उंची वाढल्याने हवेतील ऑक्सिजन साधारणपणे ३०% कमी होतो. या वातावरणाची सवय व्हावी म्हणून आजचा दिवस acclimatisation डे असल्याने आमचा मुक्काम येथेच होता. Climb Higher and Sleep Low या गिर्यारोहणाच्या
तत्वाप्रमाणे आम्ही लगतच्या डोंगरावरील watch tower पर्यंत चढाई करायचे ठरविले. भूर्जपत्रांची झाडे आणि झाडाच्या आसपास पडलेल्या दवाचे छोटे बर्फ होण्यास सुरुवात झालेली दिसत होती. तासाभरात आम्ही साधारण ८०० फूट उंच चढून watch tower ला पोहोचलो. ढग असल्याने आजूबाजूचे फारसे दिसत नव्हते परंतु चढाई करताना एके वळणावर ढग बाजूला झाले आणि सिक्कीम व नेपाळच्या सीमेवर असलेले जगातील तिसरे उंच शिखर कांचनजुंगा ने आम्हाला दर्शन दिले. पुन्हा एकदा ढग दाटून आल्याने परतीच्या प्रवासात पावलांना गती आली.
कॅम्प साईट अथवा टी हाऊस वर दुपारच्या जेवणा नंतर पत्ते आणि गप्पा टप्पा रंगल्या. उद्या तरी वातावरण चांगले असावे अशी ईच्छा प्रत्येक जण करीत होता.
खोंगमा दांडा ते दोबाटे १४००० फूट
सकाळ झाली तरीही सूर्य आज ढगांआडच लपला होता. अर्थात कालपेक्षा वातावरण थोडे बरे होते. ओळखीच्या झालेल्या रस्त्यावरून आम्ही झपाझप watch tower ओलांडून डोंगर धारे वरून शिप्टन ला पास च्या दिशेने चढू लागलो. साधारण दोन तासांच्या चढाई नंतर उंचीवरचा हा पास (खिंड) लागला. उंचीमुळे हवा कोरडी आणि आसपास पडलेले बर्फ, ढग धुके आणि थंडगार हवा यात एका छोट्याश्या निवाऱ्यात गरमागरम नुडल सुपने बहार आणली. विरळ हवे मध्ये अर्धा तास थांबून आम्ही दोबाटेच्या दिशेने निघालो.
 |
| शिप्टन ला पास |
 |
| दोबाटे जवळ शुक्ल काका आणि विपीन |
लवकरच ठुला पोखरी अर्थात हत्तीच्या आकाराचा मोठा तलाव लागला. दोन डोंगरमधील खिंडीनंतर दीड तास पायऱ्या उतरून आम्ही दोबाटेच्या कॅम्प साईटला पोहोचलो. ढग आणि धुक्याने दुपारी ३ लाच जवळपास अंधार पडला होता. एका बाजूला उंच डोंगर आणि त्याच्या अगदी जवळ छोटीशी कॅम्प साईट, पलीकडे थोडीशी झाडी आणि बाजूने खाली उतरणारी वाट अशी अत्यंत थोडक्या जागेतच ही कॅम्प साईट कशीबशी अंग चोरून बसली होती. डायनिंग हॉल मध्ये असलेली बंब शेकोटी ऊब द्यायची आणि लगोलग लाकडी दरवाजाच्या असंख्य फटी आणि छप्परातील गॅप एकमेकांशी स्पर्धा करीत गार हवेला आमंत्रण देत होत्या. त्यामुळे एकाच वेळी थोडीफार ऊब आणि थोडे कुडकुडत सगळे दाटीवाटीने बसून राहीलो. ढगांच्या आडून दिसणारे थोडेसे चांदणे आणि एका बाजूला उंच पहाड रात्रीला कॅम्प साईटला अत्यंत गूढ आणि भीतीदायक स्वरूप देत होते.
 |
| दोबाटे कॅम्प साईट |
भरीला आमची निवासस्थाने दगडावर दगड रचून केलेल्या निवाऱ्यात होती. सिमेंट माती न वापरता हे निवारे बनविल्याने असंख्य फटी आणि वर चार सहा इंच सोडून बसविलेले पत्रे यापुढे आमच्या स्लीपिंग बॅग चा टिकाव लागणे अशक्यच होते. रात्र कुडकुडत काढल्यावर सकाळी मात्र सूर्यदेव थोडे दर्शन देते झाले.
दोबाटे ते यांगले खारका १३५०० फूट
रोजच्या प्रमाणे वॉर्म अप करून कॅम्प लगतच्या पायऱ्या उतरू लागलो. दीड तास उतरल्यानंतर आम्ही सुरुवाती पासून जी डोंगर रांग दिसत होती ती ओलांडून आलो होतो. समोर बरुण नदी दिसत होती. नदीलगत जवळ पास दोन अडीच तासांची चाल होती. अनेक ठिकाणी मोठ्या दरडी कोसळल्या होत्या, कधी दरडी मधील मोठ्या शिलाखंडामाधून जिगसा पझल प्रमाणे रस्ता जात होता तर कधी एका बाजूने दरडीच्या ढिगाऱ्यावरून निसरडी वाट व दुसरीकडे नदी. विविध दरडीचे विशाल स्वरूप एवढे मोठे होते की त्या दरम्यान गप्पा बंद होऊन प्रत्येक जण सावधपणे हा मार्ग चालत होता. barun नदी ओलांडल्यावर मात्र रस्ता थोडा मोठा झाला आणि डावीकडील बाजूच्या समोरच्या डोंगरावर शिव धारा,पार्वती गुफा आणि गणेश गुहा स्पष्टपणे दिसू लागल्या. नदी पात्राजवळची जागा विस्तारून थोडेसे मैदान तयार झालेल्या जागी आमची आजची मुक्कामाची यांगले खारका ही कॅम्प साईट होती.
 |
| बरुण नदी |
येथले कॅम्प साईट अत्यंत विचारपूर्वक बनवले होते. ऊबदार निवारा आणि प्रशस्त डायनिंग हॉल मध्ये पत्ते जोरात रंगले. हा सगळाच प्रदेश अत्यंत दुर्गम असल्याने मोबाईल चार्जिंग ची सोय केवळ ह्या मुक्कामात मिळाली. चांगली विश्रांती घेऊन ताजेतवाने होऊन आम्ही लाँगमाले (किंवा नांगमाले ) येथे निघालो.
 |
| दूरवर दिसणारा शिव धारा डावीकडे आणि पार्वती गुफा |
यांगले खारका ते लांगमाले १५००० फूट
बरुण नदीच्या उजवीकडून निघालेला रस्ता बाकदार वळण घेऊन उंच वृक्षांच्या सावलीत निघाला. सावकाशपणे उंची घेत जाणाऱ्या रस्त्याच्या सोबतीला ग्लेशिअर मधून येणारे खळाळते प्रवाह, कुठे छोटेसे पूल आणि दोन्ही बाजूला हिमाच्छादित शिखरे असा अविस्मरणीय होता. थोड्याच वेळात वृक्षराजींची आणि झुडपांची सोबत संपली आणि आम्ही १३००० फुटांच्या उंचीवर पोहोचल्याचे सवंगड्यांनी जाहीर केले. या सुंदर परिसरातुन एका खिंडीकडे घेऊन जाणाऱ्या पायऱ्या आणि वर निळे गर्द आकाश हा जणू महाभारत कथेतील पांडवांचा स्वर्गावरोहिणी पथ असल्याचे भासत होते. लांगमाले कॅम्प वरून कुठेही नजर फिरविली तरी बर्फाच्छादित शिखरे दिसत होती.
लांगमाले ला आमचे स्वागत तेथल्या हसतमुख परिवाराने केले. साठीच्या पुढे असणाऱ्या येथल्या शिडशिडीत बांध्याच्या शेर्पाने ९ वेळा एवरेस्ट सर केला होता आणि मकालूसह अनेक मोहिमांमध्ये आपला सहभाग नोंदविला होता. घरात याकचे मोठे कातडे, शिंगे असा ऐवज प्रेक्षणीय आणि दुर्लभ होता.
 |
| दर मिनिटाला बदलणारा संध्याकाळचा कॅलिडोस्कोप |
लांगमाले ते मकालू बेस: थोडी आणखी प्रतीक्षा
नेहमीप्रमाणे पाच साडेपाच वाजता उठून आम्ही सातच्या सुमारास नाश्ता करून तयार झालो तोच लीडर राहुल ने जाहीर केले की खराब वातावरणामुळे आज आपण येथेच वाट पाहणार आहोत. मकालू जवळून बघण्याची प्रतीक्षा अजून एक दिवस लांबणीवर पडणार होती, परंतु घाईपेक्षा सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य असल्याने सगळेच जण निवांत झाले. अर्ध्या तासात स्नो फॉल ने चांगला जोर पकडला. सगळा परिसर शुभ्र हिमाच्छादित आणि थंडगार बनला. स्नो फॉल अनुभवण्याचा मनसोक्त आनंद सगळ्याच टीम ने घेतला. गिरिशिखरांच्या भोवताली असणाऱ्या हा मनमुराद आनंद साजरा करताना द्विगुणित केला तो आसमंत दणाणून टाकणाऱ्या शिवाजी महाराजांच्या भारदस्त घोषणा आणि जयजयकाराने. शेर्पा आणि पोर्टर मंडळी सुद्धा एकदिलाने आम्हाला सामील झाली आणि शिव छत्रपतींच्या ललकारीने शून्याखालील थंडीतही अंगावर रोमांच उभे राहिले.
 |
| बर्फवृष्टी नंतरचे लांगमाले |
मकालू बेस कॅम्प: १७५०० फूट
लांगमाले कॅम्प मागच्या डोंगराला वळसा घालून गेल्यावर डाव्या बाजूला हिम नदी, हिमशिखरे आणि नजर जाईल तो पर्यंत शुभ्र हिम चादर पसरली होती. मकालूचा परिसर हा थंड बोचऱ्या वाऱ्याचा आणि अति थंडीचा म्हणून ओळखला जातो याची प्रचिती आम्ही जसे जवळ पोहोचू तशी होऊ लागली होती. तब्बल १७५०० फुटांची उंची गाठून आम्ही मकालू बेस कॅम्प जवळ पोहोचलो. बर्फातील चार तासांच्या पायपिटी नंतर समोर ढगांनी आच्छादिलेला अजस्त्र मकालू पर्वत दर्शन देत होता. ८००० मीटर पेक्षा उंच असलेली जगात केवळ १४ शिखरे आहेत आणि या उंचीचा भारदस्तपणा केवळ दर्शनाने छाती दडपून टाकत होता. अशी शिखरे चढणे हे किती दुर्दम्य आणि अवघड असावे याची कल्पना आली आणि विविध गिर्यारोहकांच्या प्रती असलेला आदर अधिक दुणावला. ह्याच शिखराला पुण्याच्या गिरीप्रेमी संस्थेने २०१४ साली गवसणी घातल्याचा सार्थ अभिमानही दाटून आला. ढगात थोडेफार लपलेल्या मकालूचे अजस्त्र रूप कॅमेरा लेन्स मध्ये न सामाविणारे होते.
 |
| मकालू बेस कॅम्प च्या वाटेवर |
 |
| ढगांआडचा अजस्त्र मकालू पर्वत |
एवढ्यातच डावीकडे मोठा गडगडाट झाला, मकालूच्या डाव्या बाजूकडील कड्यावरून बर्फाची मोठी दरड कोसळली होती. या अधिक उंचीवरील बदलत्या वातावरणात ढगांचा लपंडाव अधिक वेगाने सुरु झाला; बेस कॅम्प आणि दूध पोखरी (तलाव) यांचे पटकन दर्शन घेऊन आम्ही समाधानाने परतीच्या मार्गी लागलो. ऍडव्हान्स टीम मधल्या विपीन, शुक्ल काका आणि सुनील यांनी मकालू तीव्र चढणीचा सामना करत शेजारच्या एका टेकडीवर उंच चढून एव्हरेस्ट व्ह्यू पॉईंट पर्यंत जाऊन आले.
मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर झळाळत होता. गप्पा गोष्टीत रंगून गेलेल्या चमूला आता परतीचे वेध लागले.
भोवताल कितीही सुंदर असला तरी आपल्याला आनंद मिळतो तो सवंगड्यांची साथ असल्यावरच. या ट्रेक मध्ये असलेल्या विविध वयोगटातील सगळ्याच मंडळींचे छान सूर जुळले. आमचा जिंदादिल शेर्पा जीवन राय (एव्हरेस्ट समिटर) रूट वर किंवा कॅम्पवर कसलीही मदत करायला कायम तयार असायचा. पंधरा दिवसांच्या सोबतीने ह्यांच्याशीही भावबंध चांगलेच जुळले, आपल्या पाच वर्षाच्या मुलीला शिकून मोठे करायचे आहे असे सांगताना त्याच्या डोळ्यातील चमक खुप काही सांगून जायची.
कॅम्प फायर भोवती हिची चाल तुरु तुरु सुरु झाल्यावर नेपाळी आणि डच मंडळींनी सुद्धा आमच्याबरोबर ठेका धरला. संगीताची जादू धर्म भाषा संस्कृती पलीकडे जाऊन किती चटकन संवाद साधते हे विस्मयकारी होते. निसर्गाची मनोहारी विविध रूपे आणि इतर अनेक अमिट आठवणींकरीता आपले नेहमीचे रुटीन सोडून पुन्हा एकदा हिमालयात नक्की भेटायचे असा निश्चय करून या ट्रेकची सांगता झाली.
 |
| गाणी आणि गप्पांचा जमलेला फड |
परतीचा प्रवास:
परतीचा प्रवास जरी सारख्याच वाटेवरून असला तरीही २-३ दिवसांच्या स्नो फॉल मुळे येताना लागलेला संपूर्ण लँडस्केप बदलून गेला होता. हिरवाईने आता गर्द पांढरी हिम दुलई आपल्या अंगावर ओढून घेतली होती तर मध्येच निळेभोर आकाश आणि पर्वताची एखादी करडी बाजू विविध रंगांची उधळण करीत होते. वाटेतल्या झऱ्यांवर बर्फाची चादर फेर धरू लागली होती तर प्रवाह ओलांडण्यासाठी बांधलेल्या पुलांच्या कठड्यावर, ओंडक्यांवर बर्फ साठू लागले होते. साधारण दोन ते सहा इंच एवढा बर्फ जमिनीवरसुद्धा सगळीकडे पसरला होता. ऊन पडून बर्फ घट्ट झालेल्या ठिकाणी पाय घसरू नये यासाठी फार काळजी घेऊन एकेक पाऊल टाकावे लागत होते. दोबाटे बेस कॅम्प वरून शिप्टन ला च्या दिशेने निघाल्यावर तर तापमापक शून्याखाली -२० इतके दाखवित होते. हातमोजे घालूनही बोटे गोठून जातील की काय अशी शंका यावी एवढी थंडी वातावरणात होती.
 |
| परतीचा प्रवास |
ठुलो पोखरी अर्थात हत्तीच्या आकाराचा तलाव
 |
| शिवधारा कडील व्ह्यू |
ट्रेक का करावा:
रोजच्या धावपळीच्या आणि रात्रंदिन वाजणाऱ्या मोबाईल मुळे आपण inflated alert स्थितीत असतो. ग्रुप असला तरीही ट्रेकमध्ये आपण आपली लय शोधून त्यावर मार्गक्रमण करत असतो. अश्या वेळी आलेली आपल्या जिवलगांची आठवण आपले त्यांच्याप्रती असलेले प्रेम अधिक दृगोच्चर करत असते. वाहनांच्या आणि बाकी कृत्रिम नागरी कोलाहलापासून दूर आपल्या श्वासाची गती आपणच नव्याने अनुभवित जातो. प्रत्येक श्वासागणिक परिसरातील हिरवाई, शांतता आणि स्वच्छ हवा आपल्या मनावर थंड झुळूक घालत असते. लांबवर पसरलेली निश्चल पर्वतराजी आणि हिरवाई जणू तृषार्त मनावर मायेचा शिडकाव करून आपल्याशी निसर्ग संवाद साधत असते. शहरीकरणाच्या वेगात एरवी विसरून गेलेले निसर्गाचे मानवाशी असलेले शब्दातीत नाते अनुभवण्यासाठी असा रिमोट ट्रेक अवश्य करायलाच हवा.
 |
| कांचनजुंगा शिखर |
इतर काही नोंदी:
येथले लोकप्रिय जेवण म्हणजे दाल भात आणि तरकारी. अंगणातील पालका सारखी पालेभाजी चिरून फोडणीला टाकायची आणि वेलांना येणारी इस्कुश ची फळभाजी. नाश्त्याला एखादे उकडलेले अंडे किंवा पुरी ऑम्लेट. सैन्य पोटावर चालते हे चिरंतन सत्य लक्षात घेऊन आमच्या सोबत काही खास महाराष्ट्रीयन शिधा घेतला होता.
स्वतःचे लवकर आवरून सगळ्यांसाठी मराठी चवीचे पोहे, पिठले, उब्जे, ड्रायफ्रूट शिरा, साबुदाणा खिचडी करण्यासाठी आमचे संजय कुलकर्णी एका पायावर तयार असायचे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी आणि सुनीलने सुद्धा एके संध्याकाळी पोळ्या करायचे मनावर घेतले.
होम स्टे, टी हाऊस चालविणाऱ्या मंडळींमध्ये स्त्री पुरुष असा भेद कमीच होता. सगळी कामे बरोबरीने करणाऱ्या सेंदुवा च्या काकांनी या प्रवासातील सुंदर चपाती आणि ऑम्लेट बनवून आम्हाला प्रेमाने खायला घातले.
 |
| आमचे पोळ्यांचे प्रयोग |
 |
| झेंडूच्या फुलांनी आमचे स्वागत करणारा शाळकरी मुलगा |
ट्रेकची श्रेणी आणि अधिक माहिती:
हा ट्रेक आपल्याला १७५०० फुटांवर घेऊन जातो त्यामुळे विरळ हवा आणि कमी ऑक्सिजन यांजबरोबर सामना करावा लागतो. तसेच एका दिवसात ५००० फुटांची उंची गाठल्याने acclimatisation साठी योग्य जागी एक दिवस अधिकचा थांबा घेणेही जरुरी असते.
८०% रूट पायऱ्या असल्याने शारीरिक क्षमतेचा कस लागतो. मध्यम ते अवघड अश्या श्रेणीचा हा प्रदीर्घ कालावधीचा ट्रेक चांगल्या टीम आणि गाईड शिवाय करणे नक्कीच टाळावे.
ट्रेकचा कालावधी १४-१५ दिवस, मुंबई पासून प्रवास ३-४ दिवस
ट्रेक दरम्यान पहिले दोन मुक्काम वगळता पुढे मोबाईल ची रेंज नाही. बहुतेक ठिकाणी मोबाईल चार्जिंग ची सोय सुद्धा नाही. काही कॅम्प वर लाईट सुद्धा नाही त्यामुळे हेड टॉर्च व्यतिरिक्त एखादा अजून टॉर्च, पॉवर बँक घेणे फायदेशीर आहे, ऑक्टोबर ते नोव्हेंबर च्या पहिल्या पंधरा दिवसात ट्रेक केला तर उत्तम वातावरण मिळण्याची अधिक शक्यता असते. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये ढग पाऊस यामुळे आसपासचा नजारा अनुभवायला मिळेलच असे नाही आणि जळवांचे प्रमाण सुद्धा लक्षणीय असते.
सहभागी सदस्य
राहुल सोनावणे, राजेश नागरे, योगेश जोशी, संजय कुलकर्णी, जयवंत पाटील, विपीन चौधरी, सुनील वणीकर, सुषमा मिसाळ, दिपाली गडाख, डॉ निलेश ततार, किशोर शुक्ल, मनोज बाग, वझे काका, ऋषिकेश वाकदकर
 |
| Pic: Vipin |
धन्यवाद
Comments