न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
सहसा न्यायमूर्ती रानडे म्हटले म्हणजे आपल्याला रमाबाई रानडे यांची आठवण पटकन येते. उंच माझा झोका मधल्या लडिवाळ लहानग्या रमा आणि त्यांचा अभ्यास घेणारे रानडे आठवतात. आमच्या आयुष्यातील काही आठवणी या रमाबाईंनी लिहिलेल्या पुस्तकात रानडे भेटत राहतात. पण रानडे यांच्या विषयी आणखी काही वाचावे असे बऱ्याच दिवसांपासून वाटत होते. अलीकडे "रानडे- प्रबोधन पुरुष" हे डॉ. अरुण टिकेकर यांचे पुस्तक हाती पडले आणि खुप आनंद झाला.
रानडे यांचा कालखंड १८४२ ते १९०१ असा आहे. लंडन युनिव्हर्सिटी च्या धर्तीवर १८५७ साली मुंबई युनिव्हर्सिटी ची स्थापना झाली. रानडे हे मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या ४ ग्रॅज्युएट मधील एक आणि प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झालेले होते. नाशिक धुळे पुणे आणि मुंबई उच्च न्यायालय येथे न्यायाधीश पदाचे काम अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी पहिले.
सामाजिक सुधारणा
सामाजिक आणि आर्थिक बंधनांमधून विधवा विवाह, बाल- जरठ विवाह, समुद्र प्रवासावरील बंदी, आंतरजातीय विवाह, लग्नात होणारी पैशांची उधळपट्टी, स्त्री शिक्षणातील समाजाची उदासीनता यावर वेळोवेळी प्रहार केले.
त्यांनी विधवा विवाह मंडळ, सार्वजनिक सभेची आणि डेक्कन सभेची स्थापना केली आणि त्यातून समाजाला शिक्षित करण्याचा प्रयत्न केला. तर्कशुद्ध मांडणी करून नव्या पिढीला समाजसुधारणेची गरज पटवून देण्याचा एक संस्थागत प्रयत्न केला. हे करताना बदलाची प्रक्रिया अत्यंत हळू चालणारी असते हे जाणून प्रचंड संयम आणि सतत प्रयत्न करीत राहणे यासाठी ते अथकपणे परिश्रम घेत होते.
भारतीय अर्थशास्त्राचा पाया
समाजकारण करीत असताना जागतिक पटलावर चाललेल्या गोष्टींचे सुद्धा त्यांना सजग भान होते. युरोपात जॉन स्टुअर्ट मिल यांनी विविध अर्थशास्त्रीय संकल्पना मांडल्या, त्याचा भारतीय दृष्टीने विचार करून भारतीय अर्थव्यवस्था आपले प्रश्न यांचा विचार करून त्यांनी "Essays on Indian Economy" हे निबंध लिहिले. १८७२ साली त्यांनी मुंबई प्रांतातील अनेक जिल्यांचे आर्थिक सर्वेक्षण सरकारी मदतीविना केले आणि त्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न आणि उपाय, शेतीचे अर्थशास्त्र, जमीन, महसूल अश्या अनेक विषयांवर लेखन, भाषणे करून जागृती निर्माण केली. एवढेच नाही तर शेतीवर अवलम्बित्व कमी करून औद्योगिक सुधारणा करायला हव्यात, केवळ हातमागावर असलेला माल स्पर्धेत टिकू शकणार नाही आदी काळाच्या पुढे जाणारे विचार मांडले. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप केवळ वसाहतवादी - कच्च्या मालाचा पुरवठादार अशीच होत आहे याची त्यांना चिंता लागलेली होती.
त्यामुळे त्यांना भारतीय अर्थविचारांचे - अर्थशास्त्राचे जनक मानले जाते.
त्यांच्या कामाचा झपाटा आणि झेप पाहून थक्क व्हायला होते. एकाच माणसाने हे सगळे केले अक्षरशः यावर विश्वास बसणे अवघड वाटावे.
इतिहासकार रानडे
पाश्चिमात्य इतिहासकारांचे मराठ्यांवरील लेखन हे पूर्वग्रहदूषित आणि अनेक त्रुटींनी भरलेले होते हे बघून त्यांनी इंग्रजीत "Rise Of Maratha Power" नावाचा ग्रंथ १९०० साली लिहिला. भारतीयांच्या भूमिकेतून मराठ्यांच्या इतिहासातील ठळक गोष्टी समोर आणणे, गैरसमज दूर करणे, आणि शिव चरित्रातील नाट्यमय प्रसंगांखेरीज इतर मूल्यांना जसे उत्तम संघटक, लोकांचा नायक, धार्मिक बाबतीत सहिष्णू, पराभूतांना सूडबुद्धीने न वागविणारा इत्यादी अनेक गोष्टीचा परिचय त्यांनी पाश्चिमात्य लोकांना करून दिला. हे करताना केवळ प्रशंसा किंवा भक्तिभाव न बाळगता विवेकी आणि चिकित्सक दृष्टीशी मोट बांधून इंग्रजांपुढे लोकांच्या राज्याचे यथायोग्य चित्र उभे केले.
अत्यंत महत्वाचे म्हणजे "या पाठीमागे ज्या इंग्रजांनी आपल्याला पराभूत केले त्यांच्या आजच्या प्रतिनिधींकडून योग्य तो समभाव मिळविणे हे माझे एकमात्र ध्येय आहे" असे रानडे यांनी प्रस्तावनेत सांगून ठेवले आहे.
Rise Of Maratha Power या ग्रंथाचा दुसरा भागाची टीपणेही रानडे यांनी लिहून ठेवली होती परंतु दुर्दैवाने त्यांना हा ग्रंथ पूर्ण करण्याइतका अवधी मिळाला नाही. (रानड्यांच्या मृत्यू १९०१ साली झाला)
मुंबई विद्यापीठावर ग्रंथ लिहिणाऱ्या डॉ. अरुण टिकेकर यांनी लिहिलेले सदर पुस्तक अगदी नेटके आणि विपुल संदर्भांनी युक्त आहे. वाचकाच्या मनावर ठसून राहील अश्या शैलीत टिकेकर लिहितात
"रानडे यांची बुद्धिमत्ता, त्यांचा दीर्घोद्योगी स्वभाव, बुद्धीला योग्य आणि न्याय्य वाटणाऱ्या गोष्टींचा पाठपुरावा करण्याची वृत्ती, प्रगाढ आशावाद असामान्य आहे. ते जे काही बोलले व केले त्यातून त्यांनी आपला निःपक्षपातीपणा, मनाची समतोलता आणि स्वभावातील मृदू कणखरता यांचंच दर्शन घडविलं होत. रानडे हे योगायोगाने किंवा अपघाताने नव्हे तर स्वभावतःच न्यायमूर्ती होते."
रानडे यांच्याबद्दल बोलताना डॉ आंबेडकर म्हणतात
"त्यांच्या विद्वत्तेची विशालता , बुद्धीची सखोलता आणि त्यांच्या दूरदृष्टीचा पल्ला यांच्याशी स्पर्धा करू शकेल किंवा याबाबतीत रानडे यांच्या बरोबरीने उभा राहू शकेल असा माणूस भारताच्या इतिहासात सापडणं अतिशय कठीण आहे. रानडे यांची दृष्टी दीर्घ पल्ल्याची होती ... एखाद्या प्रेषिताची असावी तशी!"
रानडे यांच्या लेखणीतून
"राजकीय हक्कांच्या पातळीवर तुम्ही जेव्हा खालच्या स्तरावर असता तेव्हा तुमची समाजव्यवस्था चांगली असू शकत नाही. आणि जेव्हा तुमची समाजव्यवस्था बुद्धीनिष्ठता आणि न्याय यावर आधारित नसते तेव्हा तुम्ही तुमचे राजकीय अधिकार वापरण्यास सुयोग्य नसता. तुमची समाज व्यवस्था सदोष असली तर तुम्हाला चांगली अर्थव्यवस्था लाभणार नाही, जेव्हा तुमचे धार्मिक आदर्श निकृष्ट आणि खालच्या दर्जाचे असतात तेव्हा तुम्ही सामाजिक आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही.
हे परस्परावलंब हा अपघात नसून निसर्गाचा कायदा आहे. तुमच्या शरीराची अंतर्गत व्यवस्था बिघडलेली असेल, तर तुमचे हात किंवा नुसते पाय बळकट असणार नाहीत. जे सूत्र मानवी शरीरलला लागू होते तेच सूत्र मानव समुदायालाही, ज्याला आपण समाज म्हणतो त्यालाही लागू होते. सामाजिक आणि आर्थिक बाबींची राजकीय बाबींपासून फारकत करणे चुकीचे आहे. इतर क्षेत्रातील आपल्या कर्तव्यांकडे पाठ फिरवून कोणीही व्यक्ती केवळ एकाच क्षेत्रातले कारवाई योग्यपणे पार पडू शकत नाही." - न्यायमूर्ती रानडे
Comments