स्टॅनफोर्ड विद्यापीठ, कॅलिफोर्निया Stanford University California
स्टॅनफोर्ड विद्यापीठ, कॅलिफोर्निया
| ८००० एकर विस्तीर्ण जागेमध्ये वसलेले स्टॅनफर्ड विद्यापीठ हे एक गावच आहे. येथील माजी विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या विविध आस्थापनांचा एकत्रित आकार हा जवळपास २.७ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सएवढा प्रचंड. तर येथील विद्यार्थ्यांनी पटकावलेल्या ऑलिम्पिक पदकांची संख्या आपल्यास नक्कीच आश्चर्यचकित करून सोडेल. |
कामा निमित्त सॅन-होजे सॅन-फ्रान्सिस्को परिसरात मागील वर्षी थोडी भटकंती झाली. या परिसराचा फ्लॅगशिप मॉन्युमेंट अर्थात गोल्डन गेट ब्रिज अनुभवला. या ब्रिज बरोबरील फोटो फेसबुक प्रोफाईल पिक्चर म्हणून टाके पर्यंत कॅलिफोर्निया वारी सफल होत नाही हे ऐकून असल्याने मी देखील तत्परतेने फोटो अपलोड केला. १९३७ साली बांधलेल्या गोल्डन गेटची भव्यता अनुभविणे हा देखील एक सुंदर अनुभव आहे पण त्याविषयी नंतर कधीतरी, आता आपल्या विषयाकडे वळूयात.
काम सांभाळून एके दिवशीची दुपार खास स्टॅनफर्ड व्हिजिट साठी राखून ठेवलेली. व्हिजिटर सेंटर मधील विद्यार्थ्यांनी आमचे हसतमुखाने स्वागत केले. आसपासचे फोटो बघता बघता १५ मिनिटे कशी गेली ते कुणालाच समजले नाही. व्हिजिटर सेंटर मागेच असलेल्या ४०० मीटर ऍथलेटिक ट्रॅक वर आम्हा ७५-८० पर्यटकांचे ३ ग्रुप्समध्ये विभाजन केले गेले. एका हसऱ्या व चुणचुणीत मुलीने कोणकोण जगाच्या आणि अमेरिकेच्या कुठल्या भागातून आले आहेत याची माहिती व चारदोन प्रश्न विचारून आम्हा सगळ्यांना थोडे बोलके केले.
काम सांभाळून एके दिवशीची दुपार खास स्टॅनफर्ड व्हिजिट साठी राखून ठेवलेली. व्हिजिटर सेंटर मधील विद्यार्थ्यांनी आमचे हसतमुखाने स्वागत केले. आसपासचे फोटो बघता बघता १५ मिनिटे कशी गेली ते कुणालाच समजले नाही. व्हिजिटर सेंटर मागेच असलेल्या ४०० मीटर ऍथलेटिक ट्रॅक वर आम्हा ७५-८० पर्यटकांचे ३ ग्रुप्समध्ये विभाजन केले गेले. एका हसऱ्या व चुणचुणीत मुलीने कोणकोण जगाच्या आणि अमेरिकेच्या कुठल्या भागातून आले आहेत याची माहिती व चारदोन प्रश्न विचारून आम्हा सगळ्यांना थोडे बोलके केले.
१८६० च्या दशकात अमेरिकेतील पश्चिमतीरीं असणाऱ्या कॅलिफोर्निया पासून मध्य अमेरिकेतील उटाह या राज्यापर्यंत रेल्वेमार्ग बांधण्यात बिग फोर नावाने संबोधिल्या जाणाऱ्या ४ उद्योगपतींचा मोठा वाटा होता. कॅलिफोर्नियान गोल्ड-रश दरम्यान नशीब आजमावण्यासाठी कॅलिफोर्नियात आलेले लिलॅन्ड स्टॅनफर्ड हे या बिग फोर मधील एक महत्वाचे गुंतवणूकदार. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर न्यूयॉर्क जवळ १७४१ मध्ये स्थापन झालेले प्रिन्सटन विद्यापीठ बघून पश्चिम किनाऱ्यालगतच्या शेतकऱ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून जेन व लिलॅन्ड हा विद्यापिठ स्थापनेचा खटाटोप. आपल्या तरुण मुलाच्या स्मरणार्थ त्यांनी या विद्यापीठास १८८०च्या दशकात ४० मिलियन डॉलर्सची भरभक्कम मदत केली होती.
आपल्या भारतीय मानसिकतेप्रमाणे ४० मिलियन अर्थात ४०० कोटी डॉलर्स तेदेखील साधारण १५० वर्षापूर्वीचे. जवळपास ८१०० एकर जागेवर पसरलेल्या, १२००० विद्यार्थी संख्या असलेले, विविध कॉलेजेस, वसतिगृहे, समृद्ध वाचनालये, विस्तीर्ण बगीचे यांनी नटलेल्या स्टॅनफर्ड ह्या एका गावाची खरेतर आपण सफर करत असतो. ६७ नोबेल लॉरेट्स, गुगल , सन मायक्रोसिस्टीम्स, सिस्को, याहू, एचपी आदी येथील विद्यार्थ्यांनी काढलेल्या आस्थापनांचा एकत्रित आकार हा जवळपास २.७ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सएवढा प्रचंड. (भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार हा आजमितीस $२.३ ट्रिलियन डॉलर्स आहे) हर्बर्ट हूवर अमेरिकेचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष हेदेखील स्टॅनफर्ड चे माजी विद्यार्थीच. विद्यापीठ स्थापनेचा मनोरंजक इतिहास, स्टॅनफर्ड दाम्पत्याच्या दानशूरतेची कथा व आज नावारूपाला आलेले हे विद्यापीठ ऐकून आपण मनोमन त्यांनी पाहिलेल्या दूरदृष्टीने थक्क होऊन जातो. ही गोष्ट ऐकून पावले थांबतात ती लिलॅन्ड यांच्या स्मरणार्थ पत्नी जेन हीने बांधून घेतलेल्या "मेमोरियल चर्च" पाशीच. रोमन व बायझंटाईन शैलीत बांधलेले हे चर्च व बाह्य भिंतीवरील वरील मोझॅक शैलीतील चित्रे आपल्याला खिळवून ठेवतात.
![]() |
Inner Quad![]() |
चर्चचे फोटो घेऊन आपल्या नजरेस पडते ती "द क्वाड" किंवा क्वाड म्हणून ओळखला जाणाऱ्या सगळ्यात जुन्या इमारतींचा समूह. फोर्ट परिसरात फिरण्याचा आभास तयार करणारे विस्तीर्ण व्हरांडे व खांबावरील सुंदर व नाजूक नक्षी या संपूर्ण परिसराला सालंकृत करीत होती.
१९०६ व १९८९ चे भूकंप पचवून पुन्हा त्याच दिमाखात कार्यरत असणाऱ्या या डौलदार वास्तू आजही अगदी नीटनेटक्या ठेवलेल्या आहेत. येथेच काही वर्ग आजही भरतात, तसेच विविध कार्यालये व अध्यक्ष आदी महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या कचेऱ्यादेखील आहेत. या क्वाड चे इनर क्वाड व आऊटर क्वाड असे दोन विभाग आहेत. इनर क्वाड मध्ये १२ तर आऊटर क्वाड मध्ये १६ इमारती आहेत. येथील चार कॉर्नर्सना देखील मॅथ कॉर्नर, लँग्वेज कॉर्नर, हिस्टरी कॉर्नर व जिओलॉजी कॉर्नर अशी नावे दिली आहेत. इनर क्वाड समोर भलेमोठे हिरवळीने बहरलेले विस्तीर्ण मैदान व पाल्मची झाडे असलेला पाल्म ड्राईव्ह हा रस्ता या संपूर्ण परिसरास अधिकच देखणे बनवितो. पिवळसर चुनखडी दगडाचा वापर करून बनविलेल्या प्रशस्त इमारती, लालचुटुक रंगाची उतरती छपरे व समोरील हिरवीगर्द मखमली प्रांगण अशी देखणी फ्रेम टिपायला कॅमेराही तुटपुंजाच ठरावा. क्वाड परिसराच्या प्रवेशद्वार असलेली एक मोठी कमान आपले स्वागत करते व अभिमानाने अमेरिकेच्या नागरी प्रगतीचे बिरुद अभिमानाने मिरविते.
विद्यापीठात प्रवेशघेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यासाबरोबरच एक खेळ निवडावा लागतो. तसेच प्रत्येक वसतिगृहाजवळ खेळाची काही साधने जसे टेनिस कोर्ट, टेबल टेनिस, बॅडमिंटन.खेळाचे शारीरिक व मानसिक फायदे तर मिळतातच , बरोबरीने विद्यार्थ्यांमध्ये एक आपुलकीचा - मैत्रीचा धागाही तयार होऊन कॅम्पस मधील वातावरण एका वेगळ्या उंचीला पोहोचते. विशेष प्राविण्य दाखविणाऱ्यांना अभ्यासा व्यतिरिक्त खेळाचेही ट्रेनिंग दिले जाते. अमेरिकनांची खेळ जाणीव किती जागरूक असावी व ही मंडळी खेळात कुठवर पोहोचली असावी असा विचार मनात येतो न येतो तोच एका उंच भिंतीने आमुचा रसता अडविला होता. "स्टॅनफर्ड ओलीम्पियन्स" ची सुवर्णाक्षरांनी कोरलेली नावे मिरविणारी ती दिमाखदार भिंत. अहो आजमितीला या एकट्या कॉलेजने आतापर्यंतच्या ओलीम्पिक्स मध्ये १३९ सुवर्ण पदकांसहित एकूण २७० पदकांची घसघशीत कमाई केली आहे. आता एवढी कामगिरी करायची म्हणजे विविध खेळांच्या पायाभूत सोयी व मुख्य म्हणजे खेळाडूंना प्रोत्साहित करेल अशी वर्षानुवर्षे जपलेली क्रीडा संस्कृती. ट्रिलियन बिलियन चे दमछाक करणारी आकडेवारी व सुवर्ण पदकांची तालिका आपल्याला भारता समोरील अचाट आव्हानाची आठवण करून देते.
असो, मला वाटते की खरी अमेरिका ही काचेच्या उंचच उंच बिल्डिंग किंवा मैलोन मैल पसरलेले सरळसोट रस्तेया यापेक्षा अश्या परिपकव क्रीडा संस्कृतीमध्ये व दूरदृष्टीने वर्षानुवर्षे केलेल्या अनेकविध क्षेत्रातील गुंतवणुकीमध्ये जास्त बघायला मिळते. काय पटतंय ना?
References:
1. https://en.wikipedia.org/wiki/List_of_American_universities_with_Olympic_medals
2. https://www.stanford.edu/about/history/
3. https://en.wikipedia.org/wiki/List_of_companies_founded_by_Stanford_University_alumni
References:
1. https://en.wikipedia.org/wiki/List_of_American_universities_with_Olympic_medals
2. https://www.stanford.edu/about/history/
3. https://en.wikipedia.org/wiki/List_of_companies_founded_by_Stanford_University_alumni


Comments
subhash gatade